Tuesday, July 1, 2025

 

“नाव नाही”



ती दररोज रात्री वेगवेगळ्या नावाने ओळखली जायची.

कधी “रिया”, कधी “जेनिफर”, कधी “मायशा”.

पण सकाळी, जेव्हा ती आरशासमोर बसायची, तेव्हा एकच प्रश्न ठाण मांडून असायचा —
“माझं खरं नाव कोणतं?”

एखादा ग्राहक प्रेमाचा अभिनय करायचा.
कुणी “तू वेगळी आहेस…” असं म्हणायचा.
ती हसायची, हे न सांगता:
“हो, मी खरोखर वेगळी आहे — कारण मी कोणीच नाही.

एक दिवस एका लेखकाने तिला विचारलं,
“तुझी गोष्ट लिहू का?”

ती म्हणाली,
“तू खरंच लिहशील?”
तो म्हणाला, “हो.”

ती शांतपणे म्हणाली,
“तर मग, सुरुवातीला लिही — ‘ती एक माणूस होती. बाकीचं नंतर आपोआप येईल.’”

 “सावली”

तो रोजच तिच्या कॅफेमध्ये यायचा.

कोपऱ्यातलं टेबल, नेहमीचं पुस्तक आणि एकच ऑर्डर — ब्लॅक कॉफी.

तीही दरवेळी त्याचवेळी तिथं असायची.
गुंडाळलेले केस, भरलेले डोळे आणि गप्प राहणं.

कधी संवाद झाला नाही.
पण नजरा थांबायच्या — डोळे काहीसे संकोचलेले, तरी ओळखीनं भारलेले.

एका दिवशी, तो गायब झाला.
ती खूप वेळ वाट पाहत बसली. कप टेबलावर आणि खुर्ची रिकामी.

दुसऱ्या दिवशी त्याचं पुस्तक तिच्या दारात सापडलं.
मधल्या पानात एक चिठ्ठी होती —
“आपण एकमेकांना न भेटता, सगळं ऐकून घेतलं.”

पायवाट


"पायवाट"


ती तिच्या खिडकीतून रोज पाहायची —
तो यायचा. संकोचलेला. गडबडलेला.
वेशी ओलांडताना नजर चोरायचा.

ती हसत त्याला आत घेत असे.
"आज उशीर?"
तो गप्प.

वाटेतल्या शेवटच्या वळणावर तो नेहमी थांबायचा.
लग्नाची अंगठी काढून खिशात ठेवायचा.
ती नेहमी पाहायची…
पण विचारायची नाही.

एकदा ती म्हणाली,
"तुझ्या बायकोला त्रास होत नसेल?"
तो म्हणाला,
"ती खूप चांगली आहे…
फक्त… समजून घेत नाही."

ती हसली.
"मी वाईट आहे… पण समजून घेते."

तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकले.
सगळं शांत झालं.

एक रात्री तो रडत आला.
"ती मला सोडून गेली," तो कुजबुजला.

ती काही बोलली नाही.
त्याचा हात धरला. डोळे पुसले.

तो म्हणाला,
"माझा संसार संपला."
ती म्हणाली,
"माझा सुरू झाला."



Monday, June 30, 2025

विक्रीचं सामान

विक्रीचं सामान 


पार्वतीचं खरं नाव फार कुणाला माहिती नव्हतं.

गिऱ्हाईकं तिला “संध्या” म्हणून हाक मारायची.
ती हसायची, पण त्या नावाचा तिला फार तिटकारा वाटायचा. 

एक दिवस एक म्हातारा माणूस आला.
कपाळावर आठ्या, डोळ्यात पाणी, हातात जुना फोटो.

तो म्हणाला, “माझ्या मुलीचा शोध घेतोय… पंधरा वर्षांपूर्वी पळून गेली. कुठे सापडत नाही. सगळीकडे शोधली. ही बघ तिचा फोटो...”

पार्वतीच्या हातातून तो फोटो पडला.
तोच चेहरा. तीच चुणूक. पंधरा वर्षांपूर्वीची स्वतःची आठवण जिवंत झाली.

ती थोडं वळली, डोळे मिटले. क्षणभर काहीच बोलली नाही.

मग हलक्या आवाजात म्हणाली,
“ही... इथे नाहीये. दुसरीकडे कुठेही असेल... मला नाही माहित.  ती अजून तुम्हाला आठवते, हेच खूप आहे.”

म्हातारा निघून गेला, तो वळताना त्याच्या हातातला फोटो खाली पडला.
ती तो फोटो उचलून आरश्यासमोर उभी राहिली.

आणि पहिल्यांदा स्वतःकडे पारखून पाहिलं —
"आज मी स्वतःला कुणाचीतरी मुलगी वाटले... विक्रीचं सामान नाही."

त्या रात्री तिनं खोलीचं दरवाजा बंद केला. दिवा लावला.
आणि एकटं बसून स्वतःचं नाव पुन्हा मनात म्हटलं — “पार्वती...”
त्या नावात ती पुन्हा थोडी जिवंत झाली.

जपलेला क्षण

 जपलेला क्षण 

एका जुनाट वसाहतीत तारा नावाची एक वेश्या राहत होती. तिच्याकडे रोज रात्री नवेनवे चेहरे येत, आणि पहाटे परतीच्या पावलांनी निघून जात. ती मात्र तिथेच राहायची — एका खिडकीत, एकटी, गप्प.

एका रात्री, एक तरुण आला. थोडं गोंधळलेला, थोडासा भांबावलेला. त्याने पैसे मोजले, पण हातही लावला नाही. तारा म्हणाली,
“घाबरतोस वाटतं?”
तो हसून म्हणाला, “खरं तर… बोलायला कुणीच उरलेलं नाही.”

तिनं कपडे झाकले, कंबरेवरचा ओढणी सावरली, आणि म्हणाली,
“इथे कोणी येतं ते शरीरासाठी, पण काहीजण येतात कारण त्यांना त्यांचं असं कुणीच नसतं.”

ते दोघं रात्रभर बोलत राहिले. आईवडिलांविना वाढलेल्या त्याच्या आयुष्याबद्दल, तिच्या विसरलेल्या नावाबद्दल आणि त्यामागे हरवून गेलेल्या आयुष्याबद्दल.

सकाळी तो गेला.
पैसे टेबलावर तसंच राहिले होते. तिनं ते उचलले नाहीत.

ती पहिल्यांदाच खिडकीकडे गेली, आणि स्वतःशीच म्हणाली,
“आज माझं काहीतरी विकलेलं नाही… फक्त एक क्षण जपून ठेवला आहे.”

Friday, May 29, 2020

हमीद दलवाईंच्या कथा आणि आजच्या तरुणातील नवचेतना


हमीद दलवाईंच्या कथा आणि आजच्या तरुणातील नवचेतना 


Image Source : https://alchetron.com/Hamid-Dalwai

‘हमीद दलवाईंच्या निवडक कथा’ कवयित्री बहिणाबाई चौधरी  विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या आणि मला माझे पुणे विद्यापीठातले एम. ए. चे दिवस आठवले. एम. ए. ला अभ्यासक्रमात आम्हाला अधिक वाचनासाठी हमीद दलवाईंची ‘इंधन’ ही कादंबरी होती. त्यानिमित्ताने केलेले कादंबरीचे वाचन मला व माझ्या वर्गमित्रांना हमीद दलवाईंच्या लेखनाकडे घेऊन गेले. जयकर ग्रंथालयात महत्प्रयासाने ‘लाट’ हा त्यांचा एकमेव कथासंग्रह शोधला. त्या कथांनी हमीद दलवाईंचा प्रभाव आणखी वाढला. त्यांच्याबद्दल जे जे मिळेल ते वाचू लागलो. कादंबरी-कथा यातुन हळूहळू उमगत गेलेले हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक चळवळीपर्यंत आम्हाला घेऊन आले. 

हमीद दलवाईंसारख्या चळवळीतील लेखकाच्या निवडक कथा महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना, ज्यांच्या वैचारिक वाचनाचा आवाका फक्त पाठ्यपुस्तकापर्यंत (बहुतांशी) मर्यादित असतो; शिवाय शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणातून महाविद्यालयाच्या खुल्या, निवांत आणि उत्साही वातावरणात नुकत्याच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी असणे हे अनेक अर्थांनी महत्वाचे वाटते. आपलं आयुष्य अगदी गंभीरपणे जगलेला, परंपरेविरुद्ध प्रचंड बंड पुकारलेला, आपल्या लेखनातून समाजातलं  वैचारिक दारिद्र्य दूर करू पाहणारा, १९६० च्या काळातला चळवळ्या लेखक या कोवळ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा… त्यांच्या मस्तकात भिनवयाचा… म्हणजे मोठी कसोटी लागणार होती. या सगळ्या कथांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो? हाही एक मोठा प्रश्न होता. शिवाय साहित्याभ्यासाची व अनुषंगाने वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, हेही उद्दिष्ट्य साध्य करावयाचे होते. समोर होता प्रचंड ताकदीचा लेखक, समर्थ असा धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी विचारांचा पुरस्कर्ता, वैचारिकतेचं अधिष्ठान लाभलेला आणि समकाळात अत्यंत दुर्लक्षिला गेलेला एक गुमनाम, गंभीर साहित्यकार हमीद दलवाई. 

या कथांमध्ये हमीद दलवाईंच्या एकूण जगण्याशी जुळलेला कोकणचा परिसर, तिथली भाषा, ग्रामीण वातावरण, तत्कालीन भारतीय मुस्लिम समाजाचे चित्रण, वरपांगी अत्यंत साध्या वाटणाऱ्या परंतु तर्कनिष्ठतेच्या पातळीवर अंतर्मुख करणाऱ्या घटनांनी व पात्रांनी गजबजलेल्या या कथांनी मनाला वेधून टाकले. भवतालाला सूक्ष्मपणे मांडणारा, समाजाच्या विदारक वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवणारा हा कथाकार आणि त्याच्या कथा मनाला क्षण न क्षण अस्वस्थ करत होत्या. साध्यासुध्या जीवनदर्शनातून समोर आलेली  अंतर्मुखता मनाला चटका लावत होती. प्रत्येक कथेमागची कथा शोधणे ही या कथेच्या अध्यापनातली प्रमुख गरज आहे.  

‘बाबूखानचा ग्रामोफोन’, ‘माणूस आणि गाढव’, ‘अहमद’ या कथांत दैनंदिन जीवनातल्या घटनांनी ग्रामीण माणसाचं तसंच लहान मुलांचही भावविश्व व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनदर्शनातील साधेपणा हे या कथांचं वैशिष्ट्य नजरेत भरतं. एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचा ‘बाबूखान’ आम्ही प्रत्येकानेच लहानपणी अनुभवला आहे. त्या काळात गल्लीत ज्याच्या घरी टीव्ही त्याला जास्त मान होता. संध्याकाळचा चित्रहार पाहण्यासाठी किंवा सकाळी ‘महाभारत’, ‘रामायण’ पाहण्यासाठी टीव्हीवाल्याच्या घरी केलेली गर्दी आम्ही अनुभवलीय. त्यात त्याचं इतरांवर वर्चस्व गाजवणंही अनुभवलंय. फरक इतकाच आहे, ग्रामोफोनची जागा टीव्हीने घेतली होती. या कथेतला बिनकाम्या परंतु हळव्या मनाचा बाबूखान हसत हसत डोळ्यांच्या कडा पाणावून जातो. वडिलांच्या आकस्मिक निधनाने अत्यंत गंभीर होतो. गावाकडची बाबूखानची आठवण लेखकाने अशी मांडलीय की, बाबूखान हा गावातल्या प्रत्येक मुलाच्या भावविश्वात आहेच कुठेतरी. असा बाबूखान प्रत्येकाने लहानपणी अनुभवलाय. आवडत्या तबकडीवर नाचणारा, तल्लीन होणारा, खेकसणारा पण गावाच्या वेशीवर सोडायला आलेल्या पोरांकडे मागे वळून पाहणारा... बाबूखान… आपलासा वाटला. बाबूखानसारखी कितीतरी व्यक्तिचित्रे मुलांनी भराभर मांडली. आपणही त्यांच्याबद्दल भरभरून बोलू शकतो, किंबहुना लिहू शकतो, याची जाणीव त्यांना प्रथमच झाली असावी. बाबूखानच्या कथेनंतरची मुलांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता क्षणात गंभीर झाली. असा संमिश्र अनुभव या कथेने दिला. बाबूखान गावाला विसरला पण गाव बाबूखानला विसरत नाही. तो नुसत्या गावच्याच नाही तर ही कथा वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाच्या कायम स्मरणात राहणारं पात्र बनला आहे. 

मुलांच्या भावविश्वाशी अन फक्त मुस्लिमच नव्हे तर एकूणच ग्रामीण अथवा गल्लीतल्या अनुभवाशी मिळतीजुळती कथा आहे अहमदची. अनेकांनी तर अहमदची कथा वाचल्यानंतर अहमदच्या दैनंदिनी सारखे कितीतरी किस्से सांगितले. ढोरवासरांचं चारापाणी, गोठ्याची साफसफाई, कोंबड्यांच्या खुराड्याची निगा, शेळ्या-मेंढ्यांचा सांभाळ इ. आठवणी व अनुभव मुलांना ‘अहमद’शी जुळवत गेले. चिडवणाऱ्या शाळकरी मुलांच्या विरोधात बंड पुकारणारा ‘अहमद’, बापासमोर ‘बकरी’ बनलेला ‘अहमद’, आईकडे आवडत्या खाऊची मागणी करणारा ‘अहमद’, मुलांवर दगड भिरकावल्यावर पुढे मागे काय होईल हा विचारही मनाला न शिवलेला आणि पोटामध्ये भुकेचा आगडोंब कोसळलेला ‘अहमद’ सामान्य अनुभवाला गंभीर मानसिकतेत परावर्तित करतो. फक्त एका गरीब, मुस्लिम कुटुंबातल्या मुलांचाच नव्हे तर एकूणच ग्रामीण भागातील मुलांचा प्रतिनिधी म्हणून तो मनावर ठसतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

‘माणूस आणि गाढव’ कथेतही माणूस कसा ‘गाढव’ होतो, त्याच्या मनातील लोभ त्याच्या जगण्याला कसा हीनतेच्या पातळीवर घेऊन जातो. याचा विनोदी पद्धतीने प्रत्यय या कथेतून येतो. अब्दुल्यासारखे प्रचंड व्यवहारी असे अनेक शेठजी आपण पाहिलेले आहेत. स्वार्थ साधण्यासाठी गाढव शोधायला जाणारा अब्दूल्ल्या माणसाच्या मनातील व्यवहाराची तुच्छता दर्शवणारा आहे. भवतालच्या समाजात असा अब्दूल्ल्या केव्हा न केव्हा दृष्टीस पडलाच आहे. या कथेनंतर कवडीचुंबक माणसांच्या अनेक कथा मुलांनी रंगवून सांगितल्या. 

3

‘दहा रुपयांची नोट’, ‘बेकार पण कलावंत माणसाची गोष्ट’ आणि ‘एका अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट’ या तीनही कथा तत्कालीन तरुणाचं विविधांगी चित्रण करणाऱ्या कथा वाटल्या. ‘दहा रुपयांची नोट’मधील करीम-श्रीरामची मैत्री विद्यार्थ्यांना मैत्रीचा संस्कार देते. मैत्री मध्ये व्यवहार धोकादायक असतात, ही जगाची नीती पाळणारा श्रीराम सहज डोळ्यांसमोर उभा राहतो. गावाकडे दुष्काळी परिस्थितीमुळे सण-उत्सवही साजरे करणं शक्य नाही, असे दारिद्र्याचे वातावरण कथानकाच्या मागची दुष्काळाची कथा उलगडते. श्रीरामचा स्वाभिमान कुठेतरी मुलांमध्ये चैतन्याची लाट उभी करतो. निस्वार्थ बुद्धीने जपलेलं मैत्रीचं नातं या कथेतून अभिव्यक्त होतं. 

‘अव्यवहारी अपूर्णांक’ असलेला निवेदक अत्यंत सामान्य आणि साध्या विचारांचा तरुण आहे. आजच्या तरुणांमध्ये अशीच द्विधा मनःस्थिती आपणास पाहावयास मिळते. लग्नानंतरही आयुष्यात आलेले प्रेम हेच आपल्या मानसिक दुर्बलतेचे कारण आहे कि काय? हे चिंतन त्याला करता येत नाही. म्हणून पुढील आयुष्यात त्याला एकटेपणाला सामोरे जावे लागते. कथेमधील मैत्रिणीशी असलेल्या प्रीतिभावनेचे चित्रण विद्यार्थ्यांमध्ये काहीशी कुजबुज निर्माण करते. परंतु आजच्या अल्लड वयातही त्यांना मानवी जीवनातली प्रेमभावनेची अपरिहार्यता लक्षात येण्यास ही कथा साह्यभूत ठरते. आपला जोडीदार समविचारी, प्रेमळ आणि आपल्याला आवडणारा असावा, हा आजच्या तरुणांच्या मनाला पटलेला विचार या कथेतून अधोरेखित होतो. परंतु वेळीच योग्य निर्णय घेण्यात झालेली दिरंगाई, मनाचा न ऐकलेला आवाज आणि नको तितक्या प्रमाणात विचार करण्यात वाया घालवेला वेळ आयुष्यभराचा धडा देतो, हे वास्तव अत्यंत प्रखरपणे लेखकाने मांडलेले आहे. 

नोकरी हा साठच्या काळाप्रमाणे आजच्याही तरुणांच्या सभोवती सतत निरुत्तरित प्रश्न आहे. ‘बेकार पण कलावंत माणसाची गोष्ट’मध्ये नोकरी न देता फुकटचा सल्ला देणारेच जास्त भेटतात. नोकरी अभावी अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आहेत, ते कसे सोडवायचे? या विवंचनेतल्या हमीदला त्याचे मित्र व मैत्रीण आर्थिक-मानसिक साहाय्य करतात. इथे दलवाईंनी आणखी एका मैत्रीच्या नव्या व्याख्येची केलेली मांडणी मुलांना अंतर्मुख करते. कलावंत असलो तरी कलेने पोट भरत नाही, हा जगाचा व्यवहार या कथेतून कळतो. 

मैत्रीची भावना ही वैश्विक आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील या भावनेला जागे करणाऱ्या, नवा अर्थ देणाऱ्या या तीनही कथा संपन्न असा अनुभव देतात. 

हमीद दलवाईंच्या जीवनात चळवळींना महत्वाचे स्थान होते. चळवळ ही कार्यकर्त्याचा आत्मशोधाचा एक मार्ग असते. या आत्मशोधाला योग्य वाट न गवसल्याने काय होते, याचे उत्तर सद्रुद्दीनच्या रूपात मिळते. ‘खुदा हाफिस’ ही कथा शेवटाकडे जाताना अस्वस्थ करणारी, धक्का देणारी, मनातील कारुण्यभावाला जागृत करणारी प्रचंड ताकदीची कथा आहे. वाट हरवलेला मुलगा, संसारात रमू न शकणारी सून हे घरातील उरलेसुरले चैतन्य संपवतात. आधीच दिल्ली सल्तनतने नवाबी जीवनाला नेस्तनाबूत केलेले असते. मुलगा चळवळीतून स्वतःला संपवतो. म्हाताऱ्या सासू सासर्याला एकटं वाऱ्यावर सोडून जाणारी आणि स्वतःचा नवा संसार उभा करणारी सून योग्य पाऊल उचलते का? या प्रश्नाचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही उत्तरे आली. इथे नवाबाच्या, संस्थानांच्या इतिहासाबरोबरच स्त्रीवाद, स्त्री सक्षमीकरणाची चर्चाही करता आली. विद्यार्थ्यांमध्ये आजच्या काळाशी सुसंगत राजकीय वातावरणासंदर्भात जागृती घडविता आली. हरवलेल वैभव प्राप्त करण्याच्या लालसेने बापाचा शब्द मोडणारा सद्रुद्दीन स्वतःच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतो म्हणून त्याच्या बद्दलचा तिरस्कार, उबेदुल्लाबद्दलची कणव आणि सद्रुद्दीनच्या बायकोबद्दलची दया अश्या भावांची जागृती विद्यार्थ्यांमध्ये घडवण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. 

दलवाईंच्या या कथांमधून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण अत्यंत संयतपणे मांडलेलं दिसून येतं. परंतु कथेच्या रचनेतले धक्कातंत्र अथवा कथेला लेखकाने दिलेले अचानक वळण, वाचकाला आत्ममग्न करण्याचे सामर्थ्य पुढल्या काही कथांमध्ये प्रकर्षाने जाणवले. विद्यार्थ्यांच्या एकूणच भावविश्वाशी समांतर होत गेलेला कथात्म अनुभव हा अधिक संपन्न होत होत एका उच्चतम पातळीवर पोहचतो. आपल्याला या कथांमधून अधिकचं आणखी काय मांडता येईल, या विचारांत मी कितीतरी वेळा अडकलो. कारण जीवनातल्या संकटांची, अनिश्चिततेची अपरिहार्यता दर्शवणाऱ्या कथा दलवाईंनी लिहिल्या होत्या. त्या कथा सतत अस्वस्थ करत होत्या. 

‘छप्पर’, ‘कफ़नचोर’, ‘कोल्हा आणि कोकरू’ या कथांनी झोपेचं खोबरं केलं होतं. सतत सतत या कथांमधील घटना, पात्रं, जीवनदर्शन डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखं सरकत होतं. मानवी जीवनाला इतक्या सूक्ष्मपणे चिमटीत पकडलेला हा लेखक भवताली घुमत होता. त्याचं नेमकं निरीक्षण हे मनाला कुठेतरी खोलवर हलवून टाकत होतं. त्यांच्या कथांमधील पात्रं भवताली कुठेही गवसत नव्हती पण त्याचवेळी ती तितकीच आपलीशी वाटत होती. 

‘छप्पर’ कथेतला एक गंभीर बाज सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखक इतका कमालीचा यशस्वी झाला आहे की, एखादी अत्यंत प्रभावी, ताकदीने आपला विषय मांडणारी, अत्यंत परिणामकारक अशी शॉर्ट फिल्म पाहतो आहे की काय? असे वाटले नाही तर नवलंच. जेव्हा ही कथा वर्गात चर्चेला घेतली तेव्हा तर गजबजलेला वर्ग कथेच्या शेवटाकडे जाताना सुन्न झाला होता. करीमला झालेली क्षयाची रक्ताची उलटी म्हणजे दलवाईंना वाचकांना दिलेले धक्कातंत्र होते. मुलांच्या चेहऱ्यावरची भीती-आश्चर्ययुक्त जाणीव स्पष्ट दिसत होती. मरणाला भ्यालेला करीम त्याच्या लढाईत अयशस्वी होतो, क्षयाचा बळी ठरतो, हे पाहून मुलं हताश झाली. त्याच्या जगण्याशी-मरण्याशी विद्यार्थी अनेक प्रश्न विचारू पाहत होते. दलवाईंनी त्यांना एका टोकापर्यंत आणून सोडलं होतं. जिथं त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. कितीतरी विद्यार्थ्यांनी “घराच्या छपराकडे पाहतांना करीम आठवतोय सर…” अशी प्रतिक्रिया हृदयावर हात ठेवत दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये कुठेतरी ती क्षयाची भीती सहज उमटून गेलेली मला दिसली. 

असाच एक अत्यंत धक्कादायक अनुभव देणारी ‘कोल्हा आणि कोकरू’ ही कथा. या कथेमधील हैदर आणि मरियम कितीतरी दिवस डोळ्यांसमोर येत राहिले. हैदरच्या संसारात आजाराने ग्रस्त मरियम अपार करुणा जागृत करणारी ठरते. हैदरच्या नजरेत पडलेली मरियमची कोवळी बहीण मनाला चटका देत राहते. दैन्य, दारिद्र्य, कावेबाजपणा यांनी माणसाच्या जीवनाची केलेली राखरांगोळी मरियमच्या संदर्भाने अस्वस्थ करते. “कुणाच्याही वाट्याला असं दुःख येऊ नये. हैदर आज समोर असता तर त्याला…” बोलता बोलता एक मुलगी डोळ्यातला अंगार, आवळलेल्या मुठी धरून स्तब्ध झाली. स्वतःला सावरत बोलली, “सुंदर बाईनं विधवा होऊच नये सर. या नराधमांच्या नजरेत पडण्यापेक्षा नवर्याच्या आधीच गेली असती तर बरं झालं नसतं का?” तिच्या या प्रश्नाला मी काय उत्तर देणार होतो. आजही हैदरसारख्या प्रवृत्तीची माणसं सामाजिक स्वास्थ्य खराब करत आहेत. आणि मानवी अपप्रवृत्तीतून सुटकेसाठी मरण स्वीकारणारी मानसिकता अधिकच व्यथित करत गेली. 

ग्रामीण भागातील मुलामुलीना बोलतं केलं ते ‘कफ़नचोर’ रसूलनं. संताप, उद्वेग, द्वेष, क्रोध सारे भाव एकाच वेळी चेहऱ्यावर घेऊन स्तब्ध झालेला वर्ग आजही डोळ्यांसमोर आहे. माणसां-माणसांमध्ये नरमादी हे भोगाचंच एक नातं आहे का? माणुसकीची व्याख्या काय करायची? किंवा माणसाचं माणूसपण कश्यात शोधायचं? जगण्याचा खालावलेला स्तर इतक्या हीन पातळीवर जाऊ शकतो का? दारिद्र्याची बोचणी सुटावी म्हणून या थराला जाणाऱ्या रसूलला माफ करता येईल का? त्याला मानवसमूहात राहण्याचा अधिकार आहे का? त्या चिमुकलीची अशी विटंबना करण्याचे धार्ष्ट्य त्याला कसे झाले? मानवी प्रवृत्तींनी सृष्टीचे चैतन्य फुलविले असले तरी या प्रवृत्तींना विकार म्हणावे कि विकृती? अश्या प्रश्नांचा भडीमार होऊ लागला. सैलावलेल्या, जडावलेल्या अन सामाजिकतेचे फारसे गांभीर्य नसलेल्या त्या वातावरणात बोलते झालेले हे प्रश्न नव्या युगाची नंदी निश्चित करणारे आहेत. आजचा तरुण विचार करतोय, तरुणी उद्वेगाने-संतापाने पेटून उठतेय, ग्रामीण भागातील असूनही मानवी मनात मृत तरुणीच्या देहाकडे पाहून जागृत झालेल्या कामवासनेचा जाहीर निषेध करणारी तरुणी मला हमीद दलवाईंच्या कथेचे अपत्य भासू लागली. चंगळवाद, मोबाईल, इंटरनेट च्या जाळ्यात अडकल्याचा सतत आरोप होत असलेल्या तरुणात मला हमीद दलवाईंच्या विचारांचा कार्यकर्ता दिसू लागला. एका नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीचे दलवाईंचे स्वप्न आजही साकार होऊ शकते, असा आशावाद या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांतून जाणवू लागला. कथेचे वाचन संपल्यावर कितीतरी वेळ स्तब्ध झालेल्या वर्गातून स्मशान शांतता भंगू लागली. माझ्या अंतर्मनातली खिन्नताही त्या गजबजाटात कुठेतरी दूर पळून गेली. प्रकाशाची एक ज्योत कुठूनतरी येते आणि अवघा भवताल प्रकाशमय करते, असा अनुभव त्याक्षणी आला. विचारांचे असंख्य दिवे समोर प्रदीप्त झालेले मी पाहात होतो. त्यातून क्रांतीची  ठिणगी उमटू लागली होती. माणसाने माणसाला माणसासारखे वागविले पाहिजे, या विचाराची ज्योत आणखी कशी आणि कुठून पेटली असती? 

समाजातल्या दारिद्र्य, अज्ञान, लैंगिकता, धर्मांधता आणि अनारोग्य या सारखे प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांची ओळख साध्यासोप्या भाषेत आणखी कशी करता येईल? महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय समाजाच्या निर्मितीकडे आजच्या तरुणांना घेऊन जाण्यासाठी या कथा मोठी भूमिका बजावत आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वेद-शास्त्र-पुराणांशी तुलना करायची नाही, असे ठरवले तरी त्याइतकीच अक्षर असलेली ही साहित्यसंपदा समाजाला कायम दिशादर्शन करत राहील, हे मात्र खरे. 

००००००

डॉ. संदीप कडू माळी 

मराठी विभाग,

संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, 

मुक्ताईनगर. जि. जळगांव. ४२५३०६

संपर्क : ९४२१५२१८८५

इ मेल : skm.marathi@gmail.com



हमीद दलवाई : निवडक कथा आकलन आणि आस्वाद
लेखक : प्रा. डॉ. संदीप कडू माळी